
अमरावती, 29 मे (हिं.स.) : गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे भूजल पुनर्भरण मोठ्या प्रमाणात झाले असून अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र, मेळघाट भागात अद्याप भूजल पातळी घटल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) कडून मार्च अखेरीस जिल्हाभरातील 134 निरीक्षण विहिरींच्या आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. एकूण 10 तालुक्यांमध्ये भूजल पातळी वाढली असून 4 तालुक्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे.
दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, अचलपूर आणि चांदूर बाजार या खारपाणपट्ट्यातील तालुक्यांमध्ये यावेळी भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिलासादायक चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे खारपाणपट्टा क्षेत्रात प्रथमच भूजल पुनर्भरणात सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, अंजनगाव सुर्जी तालुक्यात सर्वाधिक 3.07 मीटरने भूजल पातळी वाढली आहे. त्यानंतर अचलपूर (1.94 मी.), दर्यापूर (1.31 मी.), चांदूर बाजार (1.05 मी.), भातकुली (1.04 मी.), तिवसा (0.42 मी.), अमरावती (0.33 मी.), मोर्शी (0.20 मी.), धामणगाव (0.19 मी.) आणि चांदूर रेल्वे (0.10 मी.) तालुक्यांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.
तर धारणी (1.17 मी.), चिखलदरा (0.97 मी.), वरुड (0.26 मी.) आणि काही भागांमध्ये मोर्शी (0.20 मी.) येथे भूजल पातळीत घट झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटल्याने चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या पुनर्भरणामुळे परिस्थिती सुधारल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी