भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेय पारिख बनला स्पेलिंग बीचा चॅम्पियन
वॉशिंग्टन, 29 मे (हिं.स.) : कॅलिफोर्नियातील १४ वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थी श्रेय पारिख याने प्रतिष्ठित ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी २०२६’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने न्यू जर्सीच्या ईशान गुप्ता याचा पराभव करत हा मान मिळव
भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेय पारिख बनला स्पेलिंग बीचा चॅम्पियन


वॉशिंग्टन, 29 मे (हिं.स.) : कॅलिफोर्नियातील १४ वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थी श्रेय पारिख याने प्रतिष्ठित ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी २०२६’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने न्यू जर्सीच्या ईशान गुप्ता याचा पराभव करत हा मान मिळवला.

स्पर्धेच्या निर्णायक स्पेल-ऑफ फेरीत दोन्ही स्पर्धकांना ९० सेकंदांत शक्य तितक्या जास्त शब्दांची अचूक स्पेलिंग सांगण्याचे आव्हान देण्यात आले होते. या फेरीत श्रेयने ९० सेकंदांत ३२ शब्दांची बरोबर स्पेलिंग सांगत निर्णायक आघाडी घेतली, तर ईशान गुप्ता याने २५ शब्दांची अचूक स्पेलिंग केली.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्रेय पारिख याला विजेता घोषित करण्यात आले. याआधी तो २०२२ मध्ये ८९व्या स्थानावर होता, तर २०२४ मध्ये तो तिसऱ्या स्थानावर राहिला होता.

विजेतेपदासोबत श्रेयला ५० हजार अमेरिकन डॉलर (सुमारे ४१.५ लाख रुपये) रोख बक्षीस, स्क्रिप्स कप, स्मृतिपदक तसेच मेरियम-वेबस्टरकडून २,५०० डॉलर, डेल्टा एअरलाइन्सकडून १,००० डॉलरचे फ्लाइट क्रेडिट आणि एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाकडून ४०० डॉलर किमतीची संदर्भ पुस्तके देण्यात येणार आहेत.

तीन दिवस चाललेली ही स्पर्धा वॉशिंग्टन येथील डीएआर कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये पार पडली. यंदा अमेरिकेसह ५० राज्ये, विविध प्रदेश आणि इतर पाच देशांतील एकूण २४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत नऊ स्पर्धकांनी स्थान मिळवले होते, तर जॉर्जियातील १२ वर्षीय सर्व धारवा तिसऱ्या स्थानावर राहिला.

‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ ही जगातील अत्यंत प्रतिष्ठित स्पेलिंग स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत केवळ आठवीपर्यंतचे आणि १५ वर्षांखालील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. अनेक टप्प्यांनंतर अंतिम विजेता निवडला जातो, ज्यामध्ये स्पेलिंग आणि शब्दसंग्रह कौशल्यांची कसोटी घेतली जाते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande