कोल्हापुरात एनसीसी इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेचा शानदार समारोप
कोल्हापूर, 29 मे (हिं.स.) : एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC) – २०२६’ चे २७ ते २९ मे दरम्यान छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. एनसीस
शूटिंग स्पर्धेत कोल्हापूर ग्रुप विजेता


कोल्हापूर, 29 मे (हिं.स.) : एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC) – २०२६’ चे २७ ते २९ मे दरम्यान छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे उत्साहात आयोजन करण्यात आले. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत राज्यातील सात एनसीसी ग्रुप मुख्यालयांच्या फायरिंग संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावाचे दर्शन घडविले.

स्पर्धा एअर रायफल चाचणी आणि ०.२२ स्पोर्ट्स शूटिंग रायफल अशा दोन टप्प्यांत पार पडली. विविध स्थितींमधून नेमबाजी करत कॅडेट्सनी अचूकता आणि एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

एकूण फायरिंग गुणांच्या आधारे यजमान एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. मुंबई ‘बी’ संघाने द्वितीय, तर पुणे संघाने तृतीय क्रमांक मिळवला. अमरावती संघ चौथ्या, छत्रपती संभाजीनगर पाचव्या, नागपूर सहाव्या आणि मुंबई ‘ए’ संघ सातव्या स्थानावर राहिला.

वैयक्तिक गटात मुलांमध्ये कोल्हापूर ग्रुपच्या कॅडेट साहिश तलंकारने ३१२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. सीक्यूएमएस अभिनव शिर्के याने २७३ गुणांसह रौप्यपदक, तर छत्रपती संभाजीनगरच्या जेयूओ कार्तिक कोल्हे याने २६८ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

मुलींच्या गटातही कोल्हापूर ग्रुपने वर्चस्व राखले. जेयूओ ज्ञानेश्वरी पवार हिने २९२ गुणांसह सुवर्णपदक, तर पीओ कॅडेट सिद्धावी माने हिने २९० गुणांसह रौप्यपदक जिंकले. अमरावती ग्रुपच्या जेयूओ कावेरी सपकाळे हिने २७६ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र एनसीसी संघासाठी ४० सर्वोत्तम कॅडेट्सची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या कॅडेट्सना कोल्हापूर येथे महिनाभर विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, हा संघ १९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ दरम्यान तिरुचिरापल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘इंटर डायरेक्टोरेट स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IDSSC) – २०२६’ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या यशस्वी आयोजनाबद्दल एनसीसी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी तसेच कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर यांनी सर्व विजेत्या आणि सहभागी कॅडेट्सचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

---------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande