अमरावती विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, भाजपची जोरदार तयारी
अमरावती, २९ मे (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपने आपला उमेदवार जवळपास निश्चित करून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून अद
विधान परिषद निवडणूक..... काँग्रेस ताकदीने मैदानात उतरणार की पुन्हा एकदा भाजपसमोर शरणागती पत्करणार


अमरावती, २९ मे (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपने आपला उमेदवार जवळपास निश्चित करून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे-पाटील यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या रणांगणात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र काँग्रेसमध्ये अद्याप उमेदवाराच्या नावाभोवती संभ्रम कायम आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून “योग्य वेळेत उमेदवाराचे नाव जाहीर करू,” एवढेच सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या संथ भूमिकेमुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा आहे.

या निवडणुकीत नगरसेवक हेच मतदार असल्याने त्यांना दमदार काँग्रेस उमेदवाराची प्रतीक्षा लागली आहे. लढत तुल्यबळ झाली तरच राजकीय व्यवहार आणि ‘नजराण्याचे’ मूल्य वाढते, हे राजकारणातील उघड गुपित मानले जाते. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या कमकुवत उमेदवारीमुळे अनेकांच्या अपेक्षा फोल ठरल्या होत्या. त्यामुळे यंदा काँग्रेस प्रभावी उमेदवार देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काँग्रेसमधून हर्षजीत देशमुख, गोपिकिशन बाजोरिया आणि अनिल अग्रवाल यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तर बबलू देशमुख आणि वीरेंद्र जगताप यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमके काय सुरू आहे, हा प्रश्न अधिक गडद झाला आहे.

राज्यस्तरावर महाविकास आघाडीची बैठक घेऊन निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली असून, पुढील दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसची ही शांतता रणनीतीचा भाग असू शकते; मात्र वेळ निघून गेल्यानंतर उमेदवार जाहीर करण्याचा फारसा फायदा होत नाही. उलट कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रम वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काँग्रेस शेवटच्या क्षणी ताकदीने मैदानात उतरणार की पुन्हा एकदा भाजपसमोर नरमाईची भूमिका घेणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande