विषारी दारू मृत्यू प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल
* मुख्य सूत्रधारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी * शनिवारी घटनाग्रस्त कुटुंबीयांची घेणार भेट पुणे, 29 मे (हिं.स.) - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेची शिवसेना नेत्या व आमदार
नीलम गोऱ्हे


* मुख्य सूत्रधारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

* शनिवारी घटनाग्रस्त कुटुंबीयांची घेणार भेट

पुणे, 29 मे (हिं.स.) - पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेची शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. या घटनेबाबत दुःख व्यक्त करत त्यांनी प्रशासनाने यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कठोर पावले उचलणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले.

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत आपण सातत्याने प्रशासनाशी संवाद साधत असून विविध सूचना दिल्या जात असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. दारूच्या अवैध व्यवसायामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

विषारी दारूमध्ये वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांच्या संदर्भातही त्यांनी चिंता व्यक्त केली. “पालघर जिल्ह्यातील वाडा येथे यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. बेकायदेशीर कारखाने आणि घातक रसायनांचा वापर रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणांमध्ये अधिक प्रभावी समन्वय आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना डॉ. गोऱ्हे यांनी विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंना जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे सांगितले. तसेच, यापूर्वी संबंधित भागांत तक्रारी आल्या होत्या का आणि त्यावर योग्य वेळी कारवाई झाली का, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

उद्या दि.३०मे रोजी घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्य सरकार, स्थानिक पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना लेखी निवेदन दिल्याची माहिती दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande