खासगी क्लासेससाठी कॉलेज दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोलापूर प्रशासनाची करडी नजर
सोलापूर, 29 मे (हिं.स.)। राज्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याआधी १५ जूनपासून बारावीचे वर्ग सुरू होत असताना यंदा अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजला नियमित उपस्थित राहणे
खासगी क्लासेससाठी कॉलेज दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोलापूर प्रशासनाची करडी नजर


सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

राज्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याआधी १५ जूनपासून बारावीचे वर्ग सुरू होत असताना यंदा अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजला नियमित उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. खासगी कोचिंग क्लासेससाठी कॉलेज बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीही सक्तीची करण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.नवीन नियमानुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असणार आहे. तसेच संबंधित शाळांनी आपला यू-डायस क्रमांक आणि मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहणार आहे.याशिवाय, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिसरातील खासगी कोचिंग क्लासेससोबत कोणताही करार किंवा टायअप केला आहे का, याचीही गोपनीय पडताळणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदवावी लागणार आहे.वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती नोंदवतील, तर मुख्याध्यापकांना प्रत्येक वर्गातील उपस्थिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे तपासावी लागणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील कृती आराखडा तयार करण्यात आला असून शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना तो पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालयांना या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande