
परभणी, 29 मे (हिं.स.) : परभणी येथे स्वतंत्र पाटबंधारे मंडळ अर्थात अधीक्षक अभियंता जलसंपदा कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीला अखेर शासनाने मंजुरी दिली असून 1 जूनपासून नवीन सिंचन वर्षाच्या प्रारंभासह हे कार्यालय कार्यान्वित होणार आहे. संबंधित पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली असून भगीरथ पाणी परिषदचे अध्यक्ष अभिजीत धानोरकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
परभणी जिल्ह्यात जायकवाडी, दुधना, माजलगाव तसेच पूर्णा प्रकल्पांच्या लाभक्षेत्राचा समावेश असल्यामुळे सिंचनासंदर्भातील विविध कामांसाठी शेतकऱ्यांना अन्य जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागत होते. विशेषतः पीक पाळी, पाणी वाटप आणि तांत्रिक बाबींशी संबंधित प्रश्नांसाठी अधिकार्यांशी संपर्क साधताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या.
जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर सिंचन क्षमता असूनही स्वतंत्र पाटबंधारे मंडळ नसल्याने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर शासनाच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून सिंचन व्यवस्थापन अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या नव्या पाटबंधारे मंडळासोबतच नांदेड येथे नवीन मुख्य अभियंता कार्यालयाचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे सिंचनासंदर्भातील विविध कामांसाठी आता छत्रपती संभाजीनगरऐवजी नांदेड येथे संपर्क साधणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
परभणी येथे पाटबंधारे मंडळ स्थापन व्हावे यासाठी माजी मंत्री तथा माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांनी सातत्याने मार्गदर्शन व प्रशासकीय पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिजीत धानोरकर यांनी आभार मानले आहेत.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis