रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून पाच महिन्यांत अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई
रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्सअंतर्गत अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई केली. गेल्या पाच महिन्यांत १७ गुन्हे उघडकीस आणून त्यात २७ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण
महाराष्ट्र पोलीस


रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्सअंतर्गत अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई केली. गेल्या पाच महिन्यांत १७ गुन्हे उघडकीस आणून त्यात २७ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे सेवन, विक्री व तस्करी यांना प्रभावी आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मिशन फिनिक्स हा विशेष अमली पदार्थविरोधी उपक्रम २५ मे २०२५ पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने यावर्षीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

मिशन फिनिक्स हा उपक्रम केवळ गुन्हे दाखल करण्यापुरता मर्यादित नसून, तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविणे, समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे आणि अमली पदार्थमुक्त रत्नागिरी घडविणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

मिशन फिनिक्स अंतर्गत या वर्षात अमली पदार्थांविरोधात एकूण १७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ अमली पदार्थ सेवनाच्या तर ९ अमली पदार्थ बेकायदेशीर ताब्यात बाळगल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस पथकांनी प्रभावी छापेमारी व तपास मोहीम राबवून कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राप्त सूचनांनुसार सदर कारवाईदरम्यान एकूण २७ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ब्राऊन हेरॉइन, गांजा तसेच इतर अमली पदार्थांसह एकूण ६ लाख ६४ हजार ५९३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर आळा घालण्यासाठी केलेल्या या कारवायांमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ पुरवठा साखळीवर प्रभावी परिणाम झाला आहे.

संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईबरोबरच आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना व प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, अमली पदार्थांच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर संबंधित पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, गोपनीय तपास व नियमित छापेमारीच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अमली पदार्थांच्या विरोधात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण अवलंबून कार्यरत असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही पोलीस दलातर्फे देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande