
अमरावती, २९ मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनले आहे. एप्रिल महिन्यात ४६ गावांमध्ये ५३ उपाययोजना सुरू होत्या, मात्र मे महिन्यात ही संख्या वाढून ८४ गावांमध्ये ९३ उपाययोजनांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, महिनाभरात तब्बल ३८ नवीन गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश झाला आहे.
जिल्ह्यातील दर्यापूर आणि चांदूरबाजार तालुके वगळता उर्वरित १२ तालुक्यांतील गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला ३२ बोअरवेल आणि ६१ खासगी सिंचन विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका चिखलदरा आणि धारणी तालुक्यांना बसत असून, डोंगराळ व दुर्गम भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चिखलदरा तालुक्यातील १७ गावांमध्ये १३ बोअरवेल आणि ४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच धारणी तालुक्यातील अनेक गावांनाही पर्यायी जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. मोर्शी तालुक्यात १३, वरुडमध्ये १२, नांदगाव खंडेश्वरमध्ये १२ आणि चांदूर रेल्वे तालुक्यात ६ गावांमध्ये गंभीर पाणीटंचाई असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पावसाळा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असला, तरी ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
चिखलदऱ्यात टँकरवर गावांचा आधार
चिखलदरा तालुक्यातील ९ गावांमध्ये २१ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मोथा, खडीमल, गोलखेडा बाजार, बहादरपूर, आकी, मेहरीयम, आलाडोह, लवादा आणि गवळीढाणा (कोरडा) या गावांतील सुमारे ६ हजारांहून अधिक नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
दरम्यान, खडीमल, मेहरीयम आणि गवळीढाणा गावांमध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. काही गावांमध्ये ५९ ते ७२ टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाली असली, तरी नियमित पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी