
परभणी, 29 मे (हिं.स.) : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत आरोग्य सभापती वैशाली पंकज आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (29 मे) आरोग्य विषय समितीची बैठक पार पडली. बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून आरोग्य विभागाला विविध आवश्यक सूचना देण्यात आल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी मान्सूनपूर्व उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील 830 गावांपैकी 244 गावे नदीकाठची असून त्यातील 54 गावे जोखीमग्रस्त आहेत. संभाव्य आपत्ती आणि साथरोगांचा धोका लक्षात घेता सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना 24 तास मुख्यालयी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय पथक सक्रिय ठेवण्याबरोबरच 37 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अपेक्षित प्रसूती मातांची यादी अद्ययावत ठेवणे, आवश्यक औषधसाठा उपलब्ध करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यावर भर देण्यात आला.
आरोग्य सभापती वैशाली आंबेगावकर यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेचे वेळापत्रक दर्शनी भागात लावावे, पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखावी, रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना दिल्या.या बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग अधिकारी, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, कक्ष प्रमुख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, कनिष्ठ लेखापाल तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis