
- अभय साळुंके यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड; काँग्रेस भवनात पदग्रहण सोहळा उत्साहात
लातूर, 29 मे (हिं.स.)।
काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांची नव्याने निवड करण्यात आली असून, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अभय साळुंके यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
आज लातूर येथील काँग्रेस भवनात मावळते शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्याकडून प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी पदभार स्वीकारला. असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नूतन शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर तसेच जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल याचा प्राधान्याने विचार करून पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. पक्ष संघटनेसाठी अधिकाधिक वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
देश व राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सध्या भ्रष्टाचाराने सर्व यंत्रणा पोखरल्या असून सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही. महागाईने कळस गाठल्याने सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले आहे. त्यामुळे जनतेमध्ये सरकारबद्दल असंतोष निर्माण झाला असून जनता सक्षम पर्यायाच्या शोधात आहे.
काँग्रेस पक्षाचा विचार आणि ध्येयधोरणे ही सामान्य माणसाला न्याय देणारी असल्याचे सांगत पक्षाची भूमिका प्रत्येक घरापर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी येणाऱ्या काळात संघटन बांधणीला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही याची काळजी घ्यावी, जनगणना प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करावे तसेच बूथ यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहनही करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis