
पुणे, 29 मे (हिं.स.)। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका आता शालेय विद्यार्थी वाहतुकीलाही बसणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्कूल बसच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ १ जूनपासून लागू होणार असल्याने नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर पालकांच्या खर्चात मोठी भर पडणार आहे.राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्या तरी सीबीएसई, आयसीएसईसह अन्य बोर्डांच्या शाळा त्याआधीच सुरू होत आहेत. त्यामुळे भाडेवाढीचा परिणाम हजारो पालकांवर होणार आहे.स्कूल बस भाडेवाढीबाबत पुण्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड बस असोसिएशनच्या शालेय विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांच्यासह दिपक कुलापुरे, सचिन पंचमुख, रोहिदास दगडे, सागर चौधरी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.वाहतूक व्यावसायिकांच्या मते, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. त्यातच टायर, बसचे सुटे भाग, बॅटरी तसेच युरो-६ वाहनांसाठी लागणाऱ्या ‘ऍड ब्ल्यू’च्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे शालेय वाहतूक सेवांचे दर वाढविणे अपरिहार्य झाल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु