
बीड, 29 मे (हिं.स.)।
राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत आज परळी आणि केज विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी, बूथनिहाय बांधणी, मतदार संपर्क आणि गावपातळीवरील पक्षविस्ताराच्या कामांचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकरी आणि युवकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्रिय राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या (SIR) अनुषंगाने प्रत्येक बूथवर संघटना अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी पडताळणी, बोगस नावे वगळणे तसेच बीएलए, शाखाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बूथस्तरावर अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. युवासेनेने आगामी काळात अधिक आक्रमकपणे संघटन विस्ताराचे काम हाती घेत युवकांना पक्षाशी जोडून घेण्यासाठी सोशल मीडिया, जनसंपर्क आणि स्थानिक उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय राहावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी मंत्री भरत गोगावले, खासदार संदीपान भुमरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, युवासेनेचे अभिमन्यू खोतकर, रुपेश कदम यांच्यासह स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमूख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis