
सोलापूर, 29 मे (हिं.स.)।
भारत सरकारच्या जनगणना २०२७ अभियानांतर्गत सोलापूर शहरात सुरू असलेल्या घरगणना प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. नागरिकांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी शासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली असताना अनेक भागांत प्रत्यक्ष घराघरांत जाऊन माहिती न घेता केवळ फॉर्म वाटप करून नागरिकांनाच ते भरून देण्यास सांगितले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
१ मे ते १५ मेदरम्यान पार पडलेल्या स्व-जनगणना प्रक्रियेची कोणतीही खातरजमा न करता थेट फॉर्म वाटप सुरू असल्याने संपूर्ण मोहिमेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कुटुंबीय माहितीचे अचूक संकलन व्हावे यासाठी मोठा खर्च करून यंत्रणा उभी केली आहे. मात्र काही प्रगणक आणि पर्यवेक्षकांकडून ही जबाबदारी हलगर्जीपणे पार पाडली जात असल्याचे चित्र दिसत आहे.अनेक नागरिकांच्या मते, प्रगणक घरात न येता फक्त “हा फॉर्म भरा” असे सांगून पुढे जात आहेत. काही ठिकाणी तर माहिती समजावून न सांगता नागरिकांच्या हातात फॉर्म देऊन स्वतःच भरून द्या, असे सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती शासनाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जनगणना ही देशाच्या विकास आराखड्याचा पाया मानली जाते. निधी वाटप, शासकीय योजना, आरक्षण, नागरी सुविधा, मतदारसंघ रचना आणि लोकसंख्या आकडेवारीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी जनगणनेची माहिती आधारभूत ठरते. अशा संवेदनशील प्रक्रियेत केवळ कागदी पूर्तता होत असल्यास भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि अचूकता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना “तुम्हीच फॉर्म भरा” अशी भूमिका घेतली जात असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचाही आरोप होत आहे. काही भागांत पर्यवेक्षकांकडून कोणतीही पडताळणी न करता फॉर्म स्वीकारले जात असल्याने संपूर्ण मोहिमेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड