
रत्नागिरी, 29 मे (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करण्याचा संकल्प संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे ग्रामस्थांनी केला असून, “वृक्षारोपण २०२६” या उपक्रमांतर्गत येत्या दि. २८ जून २०२६ रोजी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेकांटे गावातील महामार्ग, बावनदी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सप्तलिंगी पूल ते बावनदी पूल असा ४ किलोमीटर परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. वाढते तापमान, कमी होत चाललेली झाडांची संख्या आणि बदलते हवामान यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटाची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.मुंबई-गोवा महामार्ग विस्तारीकरणानंतर अनेक झाडे तोडली गेली. त्यामुळे परिसरातील उष्णतेत वाढ झाली असून, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनी झाडे लावण्याचा निर्धार केला आहे.
या मोहिमेत वड, पिंपळ, चिंच, उंबर यांसारख्या दीर्घायुषी आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या झाडांची वाढ चांगली होईल आणि भविष्यात प्रवाशांना सावली तसेच परिसराला हिरवळ मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांनी ही झाडे आपण लावलेली होती, असे अभिमानाने पुढील पिढीला सांगता यावे, यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन तळेकांटे ग्रामस्थांतर्फे शरद कदम (९२२४५ ७६७०२) करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी