
पुणे, 29 मे (हिं.स.)
पुणे महापालिकेच्या मिळकतकर भरण्यास पुणेकरांनी यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अवघ्या ५८ दिवसांत नागरिकांनी तब्बल १००१ कोटी रुपये महापालिकेकडे जमा केले असून त्यामुळे पालिकेच्या महसुलात मोठी भर पडली आहे.महापालिकेकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहनपर सवलत दिली जाते. २५ हजार रुपयांपर्यंत कर असलेल्या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात १० टक्के, तर २५ हजार रुपयांपेक्षा अधिक कर असणाऱ्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. या योजनेला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत असून मुदतीत कर न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.गेल्या वर्षी मिळकतकराच्या बिलांचे वितरण उशिरा झाल्यामुळे सवलतीची योजना १ मे ते ३० जूनदरम्यान राबविण्यात आली होती. त्यावेळी २८ मेपर्यंत महापालिकेकडे ४५५ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, यंदा नियमित वेळापत्रकानुसार योजना सुरू झाल्याने महसूल वसुलीत मोठी वाढ झाली आहे.योजनेची मुदत संपण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक असून या कालावधीत आणखी २५० ते ३०० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु