
ठाणे, 29 मे (हिं.स.) - राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील एसटी डेपोच्या इमारती जुन्या जीर्ण झाल्या आहेत. गळणारे छत, तुटलेले फलाट, खड्डेमय आगार, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. याकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज लक्ष वेधले. शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील डेपोची पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी डेपोची झालेली भीषण दुरवस्था पाहून एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
ठाण्यातील सर्वच डेपोमध्ये समस्यांचा डोंगर उभे राहिले आहेत, प्रवाशांसाठी साधे पिण्याच्या पाणी नाही, व्यवस्थित स्वछता गृह नाहीत, पंखे नाहीत, बसायला योग्य आसनव्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे स्टेशन डेपो आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहणी दौऱ्या दरम्यान पाहायला मिळाला. तसेच अतिशय दुर्गंधीयुक्त असलेल्या महिला शौचालयात बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारले जात असल्याचे निदर्शनास येताच, राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ पैसे घेणे बंद करण्याचे आदेश दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 'स्मार्ट कार्ड' काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत असून, त्यासाठी वाढीव पैसे उकळले जात असल्याबद्दल तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्याला ओवळा माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मनेरा, शहर प्रमुख अनिश गाढवे, महानगर संघटक महेश कदम, उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, समन्वयक संजय तरे, ठाणे महापालिकेचे नगरसेवक शहाजी खुस्पे, संजय दळवी, विभाग प्रमुख माया पाटील, प्रशांत सातपुते, हेमचंद्र राठोडेकर, राजू शिरोडकर, अमोल हिंगे, गिरीश राजे, शशिकांत कालगुडे, राजू मोरे, रमेश शिर्के, व्यंकट कांबळे, भालचंद्र देसाई, प्रतीक राणे, लहू सावंत, ठाणे शहर संघटिका अनिता प्रभू, योगिनी चौबळ, सुनंदा देशपांडे, रसिका सुभेदार, कल्पिता पाटील, अपर्णा भोईर, कांता पाटील, अर्चना शाहीरसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*मंत्र्यांना टेस्लासाठी वेळ, पण एसटीसाठी नाही - राजन विचारे*
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. पंतप्रधान मोदी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन करतात, मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना परिवहन मंत्र्यांना टेस्लासाठी, इलेट्रीक वाहन खरेदीसाठी वेळ आहे, पण पण एसटी डेपोची दुरावस्था पाहण्यासाठी वेळ नाही अशा शब्दात परिवहन मंत्र्यांवर राजन विचारे यांनी निशाणा साधला. तसेच खोपट येथील भूखंड क्र. ४४१ व ४३८ वरील बांधकामासाठी ठाणे महापालिकेने बिल्डरच्या नावे दिलेल्या 'सीसी'ची कागदपत्रे त्यांनी अधिकाऱ्यांसमोर सादर केली, त्याबाबत अधिकारी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे उघड झाले.
*मंत्र्यांना सामान्य जनतेला होणारे हाल कळणार कधी - केदार दिघे*
राज्यातील मंत्र्यांनी आधी स्वतःच्या आलिशान गाड्यांचे चोचले बंद करावेत. जर त्यांच्यात जराही हिंमत असेल, तर त्यांनी सर्वसामान्यप्रमाणे एसटी बस, लोकल ट्रेन आणि 'बेस्ट'ने प्रवास करून दाखवावा. जोपर्यंत हे सत्ताधारी आपल्या वातानुकूलित गाड्यांमधून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत त्यांना एसटी कर्मचारी आणि महागाईच्या खाईत होरपळणाऱ्या सामान्य जनतेचे खरे हाल कधीच समजणार नाहीत. सरकार केवळ स्वतःच्या प्रसिद्धीचे स्टंट करण्यात मग्न असून, सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि शेवटपर्यंत लढत राहील. - *केदार दिघे (जिल्हाप्रमुख )*
मुख्य नियंत्रकांना निवेदनात प्रमुख मागण्या
या भोंगळ कारभाराविरोधात मुख्य ठाणे विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांना शिवसेनेच्या वतीने मागण्यांचे पत्र देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे:
१. *बसेसची तातडीने दुरुस्ती* : पावसाळा तोंडावर असल्याने गळके पत्रे आणि तुटलेल्या खिडक्या असणाऱ्या बसेस त्वरित दुरुस्त कराव्यात.
२. *अन्यायी तिकीट दरवाढ मागे घ्या:* वाढीव तिकीट दर रद्द करावेत आणि कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व भत्ते विनाविलंब द्यावे.
३. *प्रवासी सुरक्षा* : महिला व ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी डेपोमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा सक्तीची करावी आणि नवीन ई-बसेस/सीएनजी गाड्या प्राधान्याने पुरवाव्यात.
४. *खोपट, कळवा आणि वंदना डेपोचा विकास:* खोपट डेपोतील गर्दुल्ल्यांचा वावर रोखून तिथे महिलांसाठी हिरकणी कक्ष व सॅनिटरी व्हेंडिंग मशीन दुरुस्त करावेत. वंदना आणि कळवा डेपोच्या पुनर्विकासाच्या प्रलंबित फायली तात्काळ मार्गी लावावीत.
५. *स्मार्ट कार्डच्या नावाखाली लूट थांबवा:* महिला व ज्येष्ठांकडून सवलत कार्डच्या नावाखाली घेतली जाणारी २०० रुपयांची अन्यायी वसुली त्वरित बंद व्हावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर