अमरावती : महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचे सौंदर्यीकरण धुळीस
अमरावती, 29 मे (हिं.स.)। ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चा गजर करणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवरील दुभाजकांची अवस्था पाहता ते सौंदर्यीकरणासाठी आहेत की डम्पिंग यार्डसाठी,
महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचे सौंदर्यीकरण धुळीस


अमरावती, 29 मे (हिं.स.)। ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’चा गजर करणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवरील दुभाजकांची अवस्था पाहता ते सौंदर्यीकरणासाठी आहेत की डम्पिंग यार्डसाठी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावरील दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकॉल, कागद, दगड-माती, उरलेले अन्नपदार्थ तसेच विविध प्रकारचा टाकाऊ कचरा साचल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी शहर सुशोभिकरणाच्या उद्देशाने विविध रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये आकर्षक फेसिंग, शोभेची झाडे आणि हिरवळ विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या या दुभाजकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ते अक्षरशः कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार प्रशासनाच्या नजरेसमोर सुरू असतानाही स्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.रुख्मिणीनगर ते काँग्रेसनगर तसेच हमालपुरा ते काँग्रेसनगर या उच्चभ्रू वसाहतींमधील प्रमुख मार्गांवरील दुभाजकांमध्येही कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गावरील दुभाजकांमध्ये तर सर्वाधिक प्लास्टिक, थर्माकॉल आणि इतर टाकाऊ साहित्य आढळून येत असल्याने शहरात येणाऱ्या पाहुण्यांवरही नकारात्मक छाप पडत आहे.

या प्रकारावर माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, रस्ते तयार करताना दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात आले होते आणि त्याठिकाणी झाडेही लावण्यात आली होती. मात्र आज तीच ठिकाणे कचरा आणि प्लास्टिक टाकण्याचे केंद्र बनली आहेत. काही व्यापारी खुलेआम कचरा टाकत असून उद्यान विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी दररोज या मार्गांवरून ये-जा करतात. तरीही दुभाजकांमध्ये साचलेला कचरा त्यांच्या नजरेस पडत नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करण्याचा दावा करणाऱ्या शहरात मुख्य रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande