
पुणे, 29 मे (हिं.स.)।
केंद्र सरकारच्या जनगणना २०२७ च्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक तसेच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने वारंवार आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने अखेर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिल्पा राजाभाऊ येरमाळकर, सुनिल दिलीप शेळके, शिवाजी संभाजी गायाकवाड, प्रदीप बबन पारधी आणि शन्नो जॉक्सन गगादे या शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर तहसील हद्दीत जनगणना २०२७ चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी शासनाच्या पोर्टलद्वारे तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना आदेश पाठवले होते. मात्र, आदेशानंतरही शिक्षक कामासाठी उपस्थित न राहिल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु