जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धावपळ; अपूर्ण प्रस्तावांमुळे हजारो प्रकरणे रखडली
सोलापूर, 29 मे (हिं.स.) एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयाकडून तब्बल २ हजार ८५२ जात पडताळणी प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित प्रस्तावकांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, या कालाव
जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धावपळ; अपूर्ण प्रस्तावांमुळे हजारो प्रकरणे रखडली


सोलापूर, 29 मे (हिं.स.)

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयाकडून तब्बल २ हजार ८५२ जात पडताळणी प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित प्रस्तावकांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत पडताळणीसाठी दाखल झालेल्या ३ हजार ६४८ प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्याने ती प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.समितीकडून संबंधित प्रस्तावकांना ई-मेलद्वारे अर्जातील त्रुटींची माहिती देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या प्रकरणांचाही निपटारा करून प्रमाणपत्रे वितरित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या शहर व जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. बारावीनंतर विविध व्यावसायिक आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती तसेच इतर मागास प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी आवश्यक असते.जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गाऐवजी खुल्या गटातून प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे शैक्षणिक सवलती आणि आरक्षणाचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी तातडीने दूर करून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande