‘गोरे पॅटर्न’ची जिल्ह्यात चर्चा; भाजप संघटनेवर पालकमंत्र्यांची मजबूत पकड
सोलापूर, 29 मे (हिं.स.)। महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे यश संघटनशक्ती, आक्
Jay Kumar gore


सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे यश संघटनशक्ती, आक्रमक नियोजन आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे बोलले जात असून, जिल्हा भाजपमय करण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा वाटा असल्याचे पक्ष कार्यकर्ते सांगत आहेत.गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागापासून शहरातील प्रभागांपर्यंत भाजपने आपला प्रभाव वाढवला आहे. अनेक निवडणुकांमध्ये विरोधकांना मागे टाकत भाजपने वर्चस्व निर्माण केले. मात्र, पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे स्वपक्षातील काही ज्येष्ठ नेते आणि पडद्याआडून राजकारण करणाऱ्या मंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, पक्षाला यश मिळाल्यानंतरही काही मंडळी पक्षवाढीसाठी झटणाऱ्या आक्रमक पदाधिकाऱ्यांचे पाय ओढण्याचे काम करत आहेत. उघडपणे पक्षनिष्ठेच्या गप्पा मारत असताना पडद्याआडून गटबाजी, कुरघोडी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे. उमेदवार निवड, संघटनबांधणी आणि निवडणूक रणनीतीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याने सध्या जिल्हा भाजपमध्ये “गोरे पॅटर्न” प्रभावी झाल्याची चर्चा आहे.दरम्यान, नव्या नेतृत्वाला मिळणारा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आणि आक्रमक शैली काही जुन्या नेत्यांना रुचत नसल्याचेही बोलले जात आहे. “कार्यकर्त्यांच्या घामावर राजकारण करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे,” अशा शब्दांत काही पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेत पक्षासाठी काम करणाऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. पक्षात राहून पक्षालाच कमजोर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कार्यकर्तेच भूमिका घेतील, असेही बोलले जात आहे.सध्या तरी सोलापूर भाजपमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाभोवती संघटना अधिक मजबूत होताना दिसत असून आगामी काळात पक्षांतर्गत घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande