दादरमध्ये अमरहिंद मंडळाजवळ महानगर गॅस पाईपलाईनला गळती, परिसरात खळबळ
मुंबई, 29 मे (हिं.स.)। येथील दादर परिसरात अमरहिंद मंडळाजवळ महानगर गॅसच्या पाईपलाईनला अचानक गळती लागल्याने मोठी खळबळ उडाली. झाडाचा बुंधा काढण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यामुळे ही गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. पाईपलाईनमधून पाण्याच्
mahanagar gas pipeline leak dadar


मुंबई, 29 मे (हिं.स.)। येथील दादर परिसरात अमरहिंद मंडळाजवळ महानगर गॅसच्या पाईपलाईनला अचानक गळती लागल्याने मोठी खळबळ उडाली. झाडाचा बुंधा काढण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्यामुळे ही गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. पाईपलाईनमधून पाण्याच्या फवाऱ्यासारख्या वेगाने गॅस बाहेर पडू लागल्याने काही क्षणांतच परिसरात तीव्र वास पसरला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका लक्षात घेऊन महानगर गॅसचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. सुमारे पाऊण तास ही गळती सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाने तत्परता दाखवत आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना त्वरित सुरू केल्या.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गोखले मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवून ती पर्यायी मार्गाने वळवली. तसेच गोखले रोडवरील वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली. नागरिकांनी गॅसचा उग्र वास जाणवताच आपल्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेतल्या. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात नागरिकांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला.

या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. त्यामध्ये पाईपलाईनमधून गॅस वेगाने बाहेर पडताना दिसत आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे आतापर्यंत कोणतीही मोठी हानी किंवा अपघात झाल्याचे वृत्त नाही. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून, दुरुस्ती पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला. दरम्यान, 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दादर मधील गैस गळती रोखण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande