वीजचोरीमुळे महावितरणचा कडक बडगा; शेतकऱ्यांच्या मोटारी, स्टार्टर जप्त
सोलापूर, 29 मे (हिं.स.)। सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतीपंपांसाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, काही ठिकाणी वीजतारांवर अनधिकृत आकडे आणि हुक टाकून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला
mahavitran


सोलापूर, 29 मे (हिं.स.)।

सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतीपंपांसाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, काही ठिकाणी वीजतारांवर अनधिकृत आकडे आणि हुक टाकून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याने वीज वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. परिणामी महावितरणला सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सिंगल फेज लोडशेडिंग करावे लागत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.सायंकाळची वेळ ही घरगुती कामे, स्वयंपाक, जनावरांची देखभाल, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि टीव्ही पाहण्याची असते. मात्र नेमक्याच या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. उकाडा आणि विजेअभावी विशेषतः वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.महावितरणच्या माहितीनुसार, वाढत्या अनधिकृत विजेच्या वापरामुळे ट्रान्सफॉर्मर जळणे आणि तांत्रिक बिघाड होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अकलूज विभागात वीजचोरांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेअंतर्गत अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांवर थेट धाडी टाकल्या जात आहेत. वीजचोरी आढळून आल्यास संबंधित शेतीपंपाच्या मोटारी आणि स्टार्टर पेट्या तात्काळ जप्त केल्या जात आहेत. महावितरणची ही कारवाई वेगाने सुरू असून त्यामुळे अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा दिला जात असताना त्यांच्यावरच वीजचोरीच्या कारवाया का केल्या जात आहेत, असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande