
परभणी, 30 मे, (हिं.स.)। जिल्ह्यात वनाच्छादित व वृक्षाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते.
या बैठकीला महानगर पालिका आयुक्त मिलिंद नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण, विभागीय वन अधिकारी एस. एस. पठाण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
राज्यात 300 कोटी वृक्षारोपण मोहिम तसेच इतर पायाभूत सुविधा उपक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी “हरित महाराष्ट्र आयोग” स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन 2026 ते 2047 या कालावधीत राज्यात 300 कोटी वृक्षारोपण अभियान राबविण्याचा शासनाचा निर्धार असून, त्याअनुषंगाने आवश्यक नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ तसेच विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात हे प्रमाण केवळ 1.6 टक्के असून ते वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील पोटखराब जमीन, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा महाविद्यालय, मोकळ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले.
जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांकडे सध्या 27 लाखांहून अधिक रोपे उपलब्ध असून, त्यापैकी जास्तीत जास्त रोपे प्राधान्याने ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावीत. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागास रोपांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जायकवाडी, येलदरी व मासोळी प्रकल्प, नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये पूरनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच परभणी जिल्ह्यातील स्थानिक वृक्षप्रजातींबाबतची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून घेऊन त्यानुसार स्थानिक प्रजातींच्या वृक्षलागवडीस प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायती स्तरावर “जास्तीत जास्त वृक्षसंवर्धन” स्पर्धा आयोजित करून तीन किंवा पाच वर्षांनंतर किती वृक्ष जिवंत राहिले याचे मूल्यमापन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक झाड लावून त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर देण्याचे नियोजन करावे. तसेच प्रत्येक स्मशानभूमीत मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis