जातीय सलोखा आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक — प्रा. ॲड. मंजुषा साखरे
छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) : जिल्ह्यात सामाजिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील काही व्यक्तींवर विविध कारणांमुळे अन्याय व अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनां
अ


छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) : जिल्ह्यात सामाजिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील काही व्यक्तींवर विविध कारणांमुळे अन्याय व अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंजुषा साखरे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 तसेच सुधारित नियम 2015 आणि इतर कायद्यांवरील नागरी मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

कार्यशाळेला धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय कांबळे, नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षक अनिता जमादार, प्रभारी पोलीस उपअधीक्षक पी.बी. सोनवणे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, महिला व बालविकास विभागाच्या केंद्र प्रशासक प्रियंका जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे आदी उपस्थित होते.

प्रा. साखरे यांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी व नंतरही अनुसूचित जाती-जमातींवरील अन्याय सुरूच होता. तो थांबवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तरतुदी केल्या आणि त्यानंतर 1989 चा अत्याचार प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला. 2015 मधील सुधारित कायद्यामुळे अशा गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळू लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे म्हणाल्या की, विशेषतः एससी-एसटी महिलांवरील आर्थिक व मानसिक छळही या कायद्यात येतो आणि अशा प्रकरणांत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. विशेष न्यायालयांद्वारे प्रकरणांचा जलद निपटारा झाल्यास अशा गुन्ह्यांवर आळा बसतो, असेही त्यांनी नमूद केले.

महिला व बालविकास विभागाच्या प्रियंका जाधव यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत समाजात अद्यापही लैंगिक भेदभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना सुरू असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सजग राहून कायद्याचा आधार घ्यावा, तसेच शिक्षण आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

बालविवाह रोखण्याबाबत बोलताना प्रज्ञा बनसोडे यांनी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. आतापर्यंत 32 बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती देत, नागरिकांनी अशा घटनांची माहिती 1098 हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन मधुकर शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप तुषार कदम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande