
रायगड, 30 मे (हिं.स.)। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याआधी शिवसेनेकडून भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांचेही नाव पुढे येत आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील एकूण १ हजार १८ मतदार असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे २८९ तर भाजपचे २८५ मतदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असा पक्षाचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे. जुईली दळवी या अलिबाग-मुरुड परिसरात सक्रिय असून युवा नेत्या म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षानेही अचानक उमेदवार जाहीर करून निवडणुकीत रंगत आणली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि पनवेल महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना शेकापकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अलिबाग येथील शेतकरी भवनात जयंत पाटील आणि माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शेकाप पहिल्यांदाच या मतदारसंघात अधिकृत उमेदवार देत असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापची पारंपरिक ताकद असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)