डिजिटल शेतीशाळांचा उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) :शेतकऱ्यांसाठी पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद अभियान आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने खरीप हंगामातील विविध पिकांसाठी डिजिटल शेतीशाळा स
डिजिटल शेतीशाळांचा उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन


छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) :शेतकऱ्यांसाठी पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद अभियान आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने खरीप हंगामातील विविध पिकांसाठी डिजिटल शेतीशाळा सुरू करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दररोज ऑनलाइन पद्धतीने पिकांबाबत मार्गदर्शन मिळणार असून कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ थेट मोबाईलद्वारे शेतीविषयक तांत्रिक माहिती देतील.

पाणी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमधून आणि शेतकऱ्यांच्या अनुभवातून या डिजिटल शेतीशाळांचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित पिकांच्या शेतीशाळेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या झूम आयडी आणि पासकोडचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

खालील वेळापत्रकानुसार विविध पिकांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन होणार आहे—

सोमवार : बाजरी व सोयाबीन

मंगळवार : खरीप ज्वारी व कापूस

बुधवार : भुईमूग व भात

गुरुवार : घेवडा (राजमा) व मका

शुक्रवार : नाचणी तसेच तूर, मूग, उडीद

शनिवार : भाजीपाला पिके

या सर्व सत्रांसाठी ठरावीक वेळेत झूमद्वारे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. मोरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने या डिजिटल शेतीशाळांमध्ये सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande