
अमरावती, 30 मे (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून मध्यप्रदेश सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट देशी व नामांकित इंग्लिश दारूची तस्करी होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. ग्रामीण भागातील खेडी-पाड्यांमध्ये बनावट मद्याचा पुरवठा सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर बनावट देशी व इंग्लिश दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे नामांकित कंपन्यांच्या बाटल्या, लेबल आणि पॅकिंगचा वापर करून ग्रामीण भागात या दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना ही दारू खरी की बनावट, हे ओळखणे कठीण होत आहे.सातपुडा पर्वतरांगांलगतच्या दुर्गम खेड्या-पाड्यांमध्ये काही टोळ्या सक्रिय असून त्या भागात डुप्लिकेट दारूचे “पिकिंग” म्हणजेच साठवण व पॅकिंग केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ही दारू अंजनगाव सुर्जी तालुक्यासह परिसरातील गावांमध्ये पुरवठा केली जात असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी किराणा दुकानांच्या आडून, तर काही ठिकाणी गुप्त अड्ड्यांवरून ही विक्री सुरू असल्याची चर्चा आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग,, आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप होत आहे.ग्रामीण भागातील युवक आणि मजूर वर्ग या स्वस्त दरातील बनावट दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. अनेकदा अशा दारूमुळे विषबाधा, आरोग्य बिघडणे आणि गंभीर आजार उद्भवण्याचा धोका निर्माण होतो. तरीही संबंधित विभागाकडून प्रभावी मोहीम राबवली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे काही भागात वाहतुकीसाठी दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. रात्रीच्या अंधारात सीमावर्ती रस्त्यांवरून ही वाहतूक होत असल्याने प्रशासनाच्या गस्तीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक स्तरावर “सेटिंग” करूनच हा व्यवसाय सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अवैध दारू विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडत असून दुसरीकडे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना जनतेत आहे. प्रशासनाने वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठी पुण्यातील फुगेवाडी सारखी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी