परभणीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम
परभणी, 30 मे (हिं.स.) : गतवर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी मान्सून काळातील संभाव्य आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने पाथरी उपविभागातील नदी
अ


अ


परभणी, 30 मे (हिं.स.) : गतवर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी मान्सून काळातील संभाव्य आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध व बचाव कार्याची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्यात आली.

या तालमीद्वारे आपत्तीच्या काळात आवश्यक असलेल्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यात आली. नदीपात्रात बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, लाइफ जॅकेटचा वापर, आपत्कालीन समन्वय, नागरिक बचाव आणि प्राथमिक उपचार यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

हा उपक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सर्व विभागांनी आपत्तीच्या काळात समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडेक यांनी आपत्ती व्यवस्थापनातील पूर्वतयारी, जलद प्रतिसाद यंत्रणा, स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि पूरस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या अनुभवातून धडा घेत यंदाच्या मान्सूनपूर्व काळात सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत प्रत्येकी 10 प्रशिक्षित सदस्य असलेली एकूण सहा रेस्क्यू पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाचे नेतृत्व संबंधित विभागाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी ही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

रंगीत तालमीत पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू आणि जिंतूर नगरपालिका विभागांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांनी सहभाग घेतला. तसेच प्रशिक्षित स्वयंसेवक, पोहणारे जवान, बोट चालक आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांना प्रत्यक्ष नदीपात्रात प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपत्तीच्या काळात अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पूरग्रस्त भागात विनाकारण जाऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

आगामी मान्सून काळात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande