
बीड, 30 मे, (हिं.स.)। परळी तालुक्यातील ओंकार शुगर युनिट क्र.८ पांगरीने मार्च अखेरीस गाळप केलेल्या ऊसाचे देयक जाहीर दरानुसार अदा करावे, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने लढा तीव्र केला आहे. ओंकारकडून वारंवार आश्वासनांची बोळवण होत असल्याचा आरोप समितीने केला.
या महिनाअखेर जाहीर दरानुसार ऊस देयक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, अशी मागणी निवेदनातून केली. देयक अदा न झाल्यास १ जूनपासून साखर कारखान्यासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलनाचा इशारा दिला.
समितीने यापूर्वीही निवेदने, आंदोलने केली. ८ मे रोजीच्या बेमुदत सत्याग्रहावेळी कारखाना प्रशासनाने २५ मेपर्यंत जाहीर केलेल्या २९५० रुपयांप्रमाणे सर्व
शेतकऱ्यांना ऊस देयक अदा करू, असे लेखी अभिवचन दिले.
१८०० रुपये वर्गही केले. एकाच गळीत हंगामात सुरुवातीला २९५० दर, त्यानंतर १८०० रुपये देयक दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी जाहीर दरानुसार उर्वरित देयक देण्यात चालढकल सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
महिनाअखेर जाहीर दरानुसार ऊस देयक अदा न केल्यास १ जूनपासून बेमुदत सत्याग्रह सुरू करू, असा इशारा दिला. यावेळी अॅड. श्रीनिवास मुंडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, हनुमंत सोळंके, कॉ. भगवान बडे, रघुनाथ देशमुख, हनुमंत लोंढे, कृष्णा कराड, धोंडीबा दिवटे, अशोक शिंदे, दत्तात्रय तिडके, प्रभाकर मुंडे, मनोहर मुंडे, बिभीषण गित्ते आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis