नांदेडमध्ये 7 कृषि निवीष्ठा केंद्राचे परवाने निलंबीत
खत विक्रीतील अनियमिततेवर कृषी विभागाची कारवाई नांदेड, 30 मे (हिं.स.) : नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाने कठोर पावले उचलत अनेक कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत
नांदेडमध्ये 7 कृषि निवीष्ठा केंद्राचे परवाने निलंबीत


खत विक्रीतील अनियमिततेवर कृषी विभागाची कारवाई

नांदेड, 30 मे (हिं.स.) : नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाने कठोर पावले उचलत अनेक कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या आदेशानुसार नायगाव तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ॲग्रो सर्व्हिस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी आणि शिवकृपा कृषी सेवा केंद्र (नायगाव) यांचा समावेश आहे.

याशिवाय मे. वर्षा ॲग्रो ट्रेडर्स (खांबाळा, ता. मुदखेड), मे. व्यंकटरमणा कृषी सेवा केंद्र (कुरुळा, ता. कंधार) आणि मे. तिरुमला कृषी सेवा केंद्र (कुरुळा, ता. कंधार) यांच्या सुनावणीनंतर निदर्शनास आलेल्या त्रुटींमुळे त्यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

दरम्यान, मे. शिवकृपा कृषी विकास केंद्र (माळकौठा, ता. मुदखेड) आणि व्यंकटेश कृषी भांडार (नवीन मोंढा, नांदेड) यांच्या खत वितरण प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळून आल्याने तसेच संबंधित प्रकरणांमध्ये पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, रासायनिक खतांची जादा दराने विक्री, विनापरवाना विक्री किंवा उपलब्ध असूनही खतांची विक्री न केल्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रांतूनच खते व इतर कृषी साहित्य खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे खत वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande