

बीड, 30 मे (हिं.स.)।
लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा बीड यांच्या वतीने आयोजित “अजित स्मृती व्याख्यानमाला” या उपक्रमाच्या चौथ्या पुष्प कार्यक्रमास आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते. हा कार्यक्रम म्हणजे केवळ व्याख्यानमाला नव्हती, तर जनसामान्यांच्या मनात आजही जिवंत असलेल्या अजितदादांच्या विचारांना, कार्यशैलीला आणि जनतेसाठी झटणाऱ्या नेतृत्वाला वाहिलेली एक भावपूर्ण आदरांजली होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार पंडित यांनी सांगितले की अजितदादांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. विधानसभेत प्रथमच पोहोचल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली आणि अल्पावधीतच लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे अनेक महत्त्वाचे धडे शिकायला मिळाले. सभागृहातील अभ्यासपूर्ण मांडणी, निर्णयक्षम नेतृत्व, कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता ही माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.
पुढील अनेक वर्षे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची इच्छा होती पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला आणि माझ्या राजकीय प्रवासातील एक मार्गदर्शक गुरु काळाच्या पडद्याआड गेले. आजही त्यांची आठवण मनाला अस्वस्थ करून जाते. राज्याच्या राजकारणात अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा घडणे कठीण आहे; कारण अशा व्यक्तिमत्त्वांना घडण्यासाठी अनेक दशके लागतात.
मात्र त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता आपली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाला बळ देत अजितदादांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. त्यांच्या स्मृती केवळ आठवणीत नाहीत, तर आमच्या कार्यातून सदैव जिवंत राहतील.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक मा. श्री. मोईन मास्टर, प्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल बारकुल, धर्मादाय वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राम औटे, संपादक श्री. राजेंद्र होळकर, समाजसेवक श्री. जावेद कुरेशी, अग्रोइनपुट डीलर असो. चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मनमोहन कलंत्री, संपादक श्री. शेख तय्यब, उपअभियंता श्री. महेंद्र निकम, समाजसेविका श्रीमती मंदाकिनी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्व. अजितदादा… तुमचं मार्गदर्शन, तुमचं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम सदैव प्रेरणा देत राहील…!
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis