
मुंबई, 30 मे (हिं.स.)। मुंबईतील घाटकोपर परिसरातील सागर पार्क सोसायटीमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे सोसायट्यांमध्ये कुर्बानीला विरोध करत भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि इतर पदाधिकारी आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे याच सागर पार्क सोसायटीचे सचिव आणि भाजपच्या ईशान्य मुंबई विभागातील वरिष्ठ पदाधिकारी चंद्रकांत मालकर यांनीच कुर्बानीसाठी परवानगी मागितल्याची बाब समोर आल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी करण्याच्या विषयावरून वाद निर्माण झाले होते. भाजपसह काही हिंदुत्ववादी संघटनांनी सोसायट्यांच्या आवारात कुर्बानीला विरोध दर्शवला होता. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीतही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्यक्ष भेट देत कुर्बानीला जोरदार विरोध केला होता. यावेळी त्यांनी सोसायटी परिसरात अशा प्रकारच्या धार्मिक कृत्यांना परवानगी देऊ नये, अशी भूमिका मांडली होती.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात अनपेक्षित माहिती समोर आली. सागर पार्क सोसायटीकडून कुर्बानीसाठी संबंधित यंत्रणांकडे परवानगी मागण्यात आली होती आणि त्या पत्रावर सोसायटीचे सचिव चंद्रकांत मालकर यांची स्वाक्षरी असल्याचे उघड झाले. त्यामुळे विरोधाची भूमिका घेणाऱ्या भाजपसमोरच आता अंतर्गत विसंगतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रकांत मालकर हे भाजपच्या ईशान्य मुंबई विभागातील महत्त्वाचे पदाधिकारी असून सागर पार्क सोसायटीचे सचिवही आहेत. त्यांच्या स्वाक्षरीने परवानगी मागण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मालकर यांना पत्र पाठवत या प्रकाराबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
याचबरोबर भाजपच्या ईशान्य मुंबई विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनीदेखील चंद्रकांत मालकर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन परवानगी का मागण्यात आली, याबाबत सविस्तर खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाली असून चंद्रकांत मालकर नेमका कोणता खुलासा देतात आणि पक्ष यापुढे कोणती भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बकरी ईदच्या कुर्बानीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता भाजपच्या अंतर्गत शिस्त आणि भूमिकेच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule