रविवारी दुर्मीळ ‘ब्ल्यू मून’चा योग; आकाशप्रेमींसाठी पर्वणी
अमरावती, 30 मे (हिं.स.)। रविवारी (दि. ३१) आकाशात दुर्मीळ मानला जाणारा ‘ब्ल्यू मून’ पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या दिवशी मे महिन्यातील दुसरी पौर्णिमा येत असल्याने या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असे संबोधले जाते. विशेष म्हणजे या खग
उद्याला दुर्मीळ ‘ब्ल्यू मून’चा योग; आकाशप्रेमींसाठी पर्वणी


अमरावती, 30 मे (हिं.स.)।

रविवारी (दि. ३१) आकाशात दुर्मीळ मानला जाणारा ‘ब्ल्यू मून’ पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या दिवशी मे महिन्यातील दुसरी पौर्णिमा येत असल्याने या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ असे संबोधले जाते. विशेष म्हणजे या खगोलीय घटनेचा चंद्राच्या रंगाशी कोणताही संबंध नसून तो नेहमीच्या पौर्णिमेप्रमाणेच दिसणार आहे.

खगोलशास्त्रानुसार कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये सुमारे २९.५ दिवसांचे अंतर असते. त्यामुळे एखाद्या महिन्याच्या सुरुवातीलाच पहिली पौर्णिमा आली, तर त्याच महिन्याच्या अखेरीस दुसरी पौर्णिमा येऊ शकते. अशा वेळी दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्ल्यू मून’ असे नाव दिले जाते. यंदा मे महिन्यात १ मे रोजी पहिली पौर्णिमा झाली होती, तर ३१ मे रोजी दुसरी पौर्णिमा होत असल्याने हा दुर्मीळ योग जुळून आला आहे.

फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने त्या महिन्यात दोन पौर्णिमा कधीच येत नाहीत. मात्र इतर कोणत्याही महिन्यात अशी शक्यता असते. साधारणपणे दर ३० महिन्यांनी एकदा ‘ब्ल्यू मून’चा योग येतो. यापूर्वी ३० ऑगस्ट २०२३ रोजी हा योग आला होता. यानंतर ३१ डिसेंबर २०२८ रोजी पुन्हा एकदा ‘ब्ल्यू मून’ पाहायला मिळणार आहे.इतिहासात ‘ब्ल्यू मून’ची संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे वापरली गेली आहे. प्राचीन काळात एका ऋतूमध्ये येणाऱ्या चौथ्या पौर्णिमेतील तिसऱ्या पौर्णिमेला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जात असे. तसेच एखाद्या वर्षात १३ पौर्णिमा आल्यास तेराव्या पौर्णिमेलाही ‘ब्ल्यू मून’ संबोधण्याची प्रथा होती. काही वेळा एकाच वर्षात दोनदा ‘ब्ल्यू मून’चा योगही येतो. विशेषतः जानेवारी महिन्यात पहिला आणि मार्च महिन्यात दुसरा ‘ब्ल्यू मून’ दिसण्याची शक्यता असते. असे चक्र सुमारे १९ वर्षांनी पुन्हा घडते.खगोल अभ्यासकांनी नागरिकांना या घटनेबाबत अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. ‘ब्ल्यू मून’ हा केवळ खगोलीय योग असून त्याचा शुभ-अशुभ घटनांशी कोणताही संबंध नाही. हा चंद्र इतर पौर्णिमांप्रमाणेच असतो. त्यामुळे आकाशातील या दुर्मीळ दृश्याचा आनंद घ्यावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande