जालन्यात ऍथलेटिक्स खेळाडू निवड चाचणी; 15 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मिशन लक्षवेध” या धोरणात्मक योजनेअंतर्गत जालना येथे ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारासाठी जिल्हा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्याची
जालन्यात ऍथलेटिक्स खेळाडू निवड चाचणी; 15 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मिशन लक्षवेध” या धोरणात्मक योजनेअंतर्गत जालना येथे ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारासाठी जिल्हा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी विशेष निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रतिभा विकास निपुणता केंद्र कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून, प्रथम टप्प्यात ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडूंची निवड केली जाणार आहे. इच्छुक व पात्र खेळाडूंनी 15 जून 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

खेळाडू निवड चाचणी 17 जून 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2026 रोजी 25 वर्षांखालील मुलगे आणि मुली पात्र असतील.

निवड प्रक्रियेसाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाइड प्रमाणपत्र तसेच पालकांचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

खेळाडू महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे बंधनकारक असून, राज्यस्तरीय पदकविजेते, राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू किंवा AITA राष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल तीन क्रमांकातील खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच SGFI, AFI आणि खेलो इंडिया नॅशनल स्पर्धांमधील कामगिरीचा विचार करण्यात येणार आहे.

खेळाडूंच्या मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. याशिवाय क्रीडा कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती (फिटनेस) चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक राहील. शासनमान्य डॉक्टरांकडून जारी केलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रही अनिवार्य असणार आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेंद्र पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे संपर्क साधावा किंवा क्रीडा मार्गदर्शक अशिष जोगदंड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande