
लातूर, 30 मे (हिं.स.)
जळकोट तालुक्यात येणाऱ्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये पाणीटंचाई जाणवू नये यासाठी शासनाच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 'पाणीपुरवठा योजनेची कामे गत दोन वर्षांपासून सुरू आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विविध कन्स्ट्रक्शनमार्फत ही कामे सुरू आहेत मात्र दोन वर्षांनंतरही तालुक्यातील जवळपास १८ गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे अर्धवटच आहेत अन्य गावांमध्ये कामे पूर्ण झाली नसली तरी गावामध्ये पाणीपुरवठा मात्र सुरू आहे.
बेळसांगवी, बोरगाव खुर्द, चेरा, धामणगाव, गव्हाण, लाळी खुर्द, मेवापूर, रामपूर तांडा शेलदरा, डोंगरेवाडी तांडा, वडगाव, येवरी, उमरगा, उमरदरा, केकतशिंदगी, येलदरा, कंरजी, कोनाळी डोंगर,' जिरगा, डोमगाव या गावांमध्ये
सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या गावात म्हणावी तेवढी पाणीटंचाई जाणवत नाही तर माळहिपरगा, पाटोदा बु, गुत्ती, लाळी बु, विराळ, मंगरूळ, कोळनूर या गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे ठप्प आहेत तरीही या ठिकाणी पाणी सुरू आहे. जळकोट येथील पाणीपुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन
अंतर्गत झालेल्या कामामधूनच पाणीपुरवठा व्हावा नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी जळकोट येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
जळकोट तालुक्यात ४८ गावांसाठी ही जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. याचे काम गत अनेक वर्षापासून सुरू आहे मात्र निधी अभावी अनेक गावांमध्ये कामे प्रलंबित आहेत जवळपास ३३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती मात्र आतापर्यंत केवळ शासनाकडून या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी प्राप्त न झाल्यामुळे कंत्राटदाराने कामे थांबवली आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये कामेही अर्धवटच आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis