
छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 32 इच्छुकांनी एकूण 60 कोरी नामनिर्देशनपत्रे प्राप्त केली असून दोन उमेदवारांनी अधिकृतपणे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
भारत निवडणूक आयोग यांनी 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघासाठी निवडणूक अधिसूचना 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातून आजअखेर 32 व्यक्तींनी एकूण 60 नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत. तसेच दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करून निवडणूक प्रक्रियेत अधिकृत प्रवेश केला आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. इच्छुक उमेदवारांना सोमवार, 1 जून 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे.
ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे पार पडणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून पुढील दोन दिवसांत आणखी उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत निवडल्या जाणाऱ्या या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis