सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता; पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन
सोलापूर, 30 मे (हिं.स.)। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, अ
rain


सोलापूर, 30 मे (हिं.स.)। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, अपुऱ्या पावसावर पेरणीची घाई करू नये, असा महत्त्वाचा इशारा कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती वेगाने सुरू असली तरी केरळमधील मॉन्सूनच्या हालचालींमध्ये विलंब झाल्याने महाराष्ट्रात त्याचे आगमन काहीसे उशिरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. असे असले तरी जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मॉन्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानात घट होऊन उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागांत तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अवकाळी पावसानंतर तापमानात काहीशी घट झाली असली, तरी आगामी काळात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरी कृषी विभागाने सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. शेतात पुरेशी ओल निर्माण होण्यासाठी किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याबरोबरच दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande