
रोडटच जमिनीला मिळणार कोट्यवधींचा भाव ?नाशिक, 30 मे (हिं.स.) : सिंहस्थ परिक्रमा रिंग रोड प्रकल्पासाठी नाशिक तालुक्यातील गौळाणे गावात होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. रिंग रोडचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाशी संबंधित काम पाहणाऱ्या ‘एकम’ कंपनीच्या संचालकांनी खरेदी केलेल्या जमिनीचा सुरुवातीच्या आराखड्यात समावेश नसतानाही नंतर अलाइनमेंट बदलून त्या जमिनीचा काही भाग बाधित क्षेत्रात दाखविण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
0
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एकम’ कंपनीचे संचालक सचिन चिंतावार यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये गौळाणे येथील गट क्रमांक 11/5 व 11/6 मधील एकूण 138 गुंठे जमीन खरेदी केली. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावित भूसंपादन यादीत या जमिनीचा समावेश नव्हता. तसेच 13 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम भूसंपादन यादीतही संबंधित क्षेत्राचा समावेश नव्हता.
मात्र, त्यानंतर अचानक अलाइनमेंटमध्ये बदल झाल्याचे सांगितले जात असून गट क्रमांक 11/6 मधील सुमारे 21 गुंठे जमीन रिंग रोडसाठी बाधित दाखविण्यात आली आहे. यामुळे उर्वरित सुमारे 88 गुंठे जमीन थेट रिंग रोडलगत येणार असून तिचे बाजारमूल्य भविष्यात कोट्यवधी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, भूसंपादन प्रक्रियेत विशिष्ट व्यक्तीला लाभ मिळावा यासाठी अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, विहिरी आणि शेततळे या प्रकल्पामुळे बाधित होत असताना सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या संचालकांनाच फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही अलीकडेच कुंभमेळा कामांतील कथित भ्रष्टाचाराबाबत गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. गौळाणे येथील हा प्रकार समोर आल्यानंतर या आरोपांना अधिक बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या प्रकरणी जिल्हा प्रशासन, सिंहस्थ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, तसेच अलाइनमेंट बदलामागील नेमकी कारणे काय आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनाक्रम
27 नोव्हेंबर 2025 – 138 गुंठे जमीन खरेदी
10 डिसेंबर 2025– प्रस्तावित भूसंपादन यादीत समावेश नाही
एप्रिल 2026 – जमिनीची मोजणी
13 मे 2026 – अंतिम भूसंपादन यादीतही समावेश नाही
त्यानंतर – गट क्रमांक 11/6 मधील 21 गुंठे क्षेत्र अचानक रिंग रोडसाठी बाधित दाखविण्यात आल्याचा आरोप
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV