'केनेडी सेंटरमधून ट्रम्प यांचे नाव हटवावे,' अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना न्यायालयाचा मोठा धक्का
वॉशिंग्टन, 30 मे (हिं.स.)अमेरिकेच्या एका न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला, ज्यानुसार प्रसिद्ध ''केनेडी सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स''चे नाव बदलून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर होते. न्यायालयाने इमार
डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन, 30 मे (हिं.स.)अमेरिकेच्या एका न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला, ज्यानुसार प्रसिद्ध 'केनेडी सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स'चे नाव बदलून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर होते. न्यायालयाने इमारतीवरून ट्रम्प यांचे नाव तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देताना, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वॉशिंग्टनस्थित या कला केंद्रावरील नियंत्रण सोडत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी स्वतःला या केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करून त्यावर नियंत्रण मिळवले होते.

न्यायाधीश क्रिस्टोफर कूपर यांनी निकालात म्हटले आहे की, न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की, मंडळाने एकतर्फीपणे केनेडी सेंटरचे नाव बदलून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नाव ठेवले होते, ज्यामुळे त्यांनी आपल्या कायदेशीर मर्यादा ओलांडल्या होत्या.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनच्या मध्यभागी असलेल्या या प्रतिष्ठित कला केंद्राला दिवंगत माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले होते. पण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, केंद्राच्या नियामक मंडळाने एक ठराव मंजूर करून त्याचे नाव बदलून 'ट्रम्प केनेडी सेंटर' ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच, केनेडी यांच्या नावाच्या अगदी वर, इमारतीच्या मुख्य दर्शनी भागावर मोठ्या सोनेरी अक्षरांमध्ये ट्रम्प यांचे नाव कोरण्यात आले.

न्यायालयीन निकालातील या धक्क्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायाधीशांवर जोरदार टीका केली आणि सोशल मीडियावर लिहिले की ते या मरणासन्न संस्थेतून माघार घेत आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ते या अयशस्वी संस्थेला काँग्रेसकडे परत पाठवण्यासाठी काँग्रेससोबत काम करतील, जेणेकरून ते या संस्थेचे काय करायचे याचा निर्णय घेऊ शकतील.

जोपर्यंत मी माझे सर्वोत्तम काम करण्यास मोकळा होत नाही: म्हणजेच या संस्थेची भौतिक, आर्थिक आणि कलात्मक पुनर्बांधणी करणे, तोपर्यंत मला अशा निराशाजनक प्रवासात काहीही रस नाही. विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे हे प्रदीर्घ निवेदन अशा वेळी आले, जेव्हा संपूर्ण जग इराण शांतता करारासंदर्भात एका संभाव्य मोठ्या घोषणेची वाट पाहत होते.

जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून, डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी आणि अधिकृत संकेतस्थळांवर आपले नाव आणि प्रतिमा लावण्याचे पाऊल उचलले आहे, जे अमेरिकन राजकीय परंपरांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आता बंद पडलेल्या 'यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीस'चे नाव आधीच ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. न्याय विभाग आणि कृषी विभागाच्या बाहेर ट्रम्प यांचा चेहरा असलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त, ट्रम्प प्रशासन एका नवीन २५० डॉलरच्या नोटेवर ट्रम्प यांचा फोटो छापण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे, तर दीर्घकाळापासून चालत आलेल्या परंपरेचा आणखी एक भंग करत, एका भव्य बॉलरूमसाठी जागा मोकळी करण्याकरिता, ट्रम्प यांनी कोणतीही सार्वजनिक चर्चा किंवा पूर्वसूचना न देता व्हाईट हाऊसचा ईस्ट विंग पाडून टाकण्याचा आदेश दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande