जळगाव विधान परिषदेसाठी 'मविआ'क़डून शरद तायडे यांना उमेदवारी
जळगाव, 30 मे (हिं.स.) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक शरद शामराव तायडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्या
जळगाव विधान परिषदेसाठी 'मविआ'क़डून शरद तायडे यांना उमेदवारी


जळगाव, 30 मे (हिं.स.) : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक शरद शामराव तायडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

जळगाव विधान परिषद मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाट्याला आली असून पक्षाचे जळगाव महानगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक शरद तायडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उमेदवारी जाहीर होताच शरद तायडे यांनी निवडणूक प्रचाराची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर आता महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande