सोलापुरातील विडी उद्योग संकटात; 25 हजार महिला कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार
सोलापूर, 30 मे (हिं.स.) : सोलापूरच्या पारंपरिक विडी उद्योगासमोर सध्या गंभीर आव्हाने उभी ठाकली असून त्याचा थेट परिणाम हजारो महिला कामगारांच्या उपजीविकेवर होत आहे. ग्राहकसंख्येत झालेली घट, वाढता करभार आणि तंबाखूविरोधी शासकीय धोरणांमुळे उद्योगाची घसरण
gfd


सोलापूर, 30 मे (हिं.स.) : सोलापूरच्या पारंपरिक विडी उद्योगासमोर सध्या गंभीर आव्हाने उभी ठाकली असून त्याचा थेट परिणाम हजारो महिला कामगारांच्या उपजीविकेवर होत आहे. ग्राहकसंख्येत झालेली घट, वाढता करभार आणि तंबाखूविरोधी शासकीय धोरणांमुळे उद्योगाची घसरण सुरूच आहे. परिणामी सुमारे 25 हजार महिला कामगारांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील सर्वाधिक विडी उत्पादन सोलापुरात होते. एकेकाळी शहरातील कारखान्यांमधून दररोज तीन ते चार कोटी विड्यांचे उत्पादन होत होते. मात्र सध्या हा आकडा घसरून केवळ 1.30 ते 1.40 कोटी विड्यांपर्यंत आला आहे. राज्यातील एकूण विडी उत्पादनापैकी जवळपास 50 टक्के उत्पादन आजही सोलापुरात होत असले तरी उद्योगाच्या वेगाने होत असलेल्या ऱ्हासामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या शहरातील 14 विडी कारखान्यांमध्ये सुमारे 25 हजार महिलांना रोजगार उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी ही संख्या 60 हजारांहून अधिक होती. तंबाखू नियंत्रण आणि धूम्रपानविरोधी कायद्यांतील कठोर अटींमुळे उद्योगाला मोठा फटका बसल्याचे उद्योग प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

विडी उद्योगावर करांचा मोठा बोजा असल्याचेही उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे. विडी निर्मितीसाठी लागणाऱ्या तंबाखूवर 40 टक्के जीएसटी, तेंदूपत्त्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. तसेच तयार विडीवर 10 टक्के उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी), 18 टक्के जीएसटी आणि 1 टक्का एनसीसीडी कर लागू आहे. याशिवाय कामगारांच्या मजुरीत झालेली वाढही उत्पादन खर्च वाढवणारी ठरत आहे.

या सर्व घटकांमुळे विडीच्या किंमती वाढल्या असून ग्राहकांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. उद्योगाच्या अडचणी वाढत असताना राजकीय स्तरावर अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची खंतही उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

उद्योगाशी संबंधित घटकांच्या मते, योग्य धोरणात्मक निर्णय आणि शासकीय मदत मिळाली नाही तर सोलापूरच्या शतकाहून अधिक परंपरा असलेल्या विडी उद्योगासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या उद्योगाशी निगडित हजारो कुटुंबांच्या भविष्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande