
छत्रपती संभाजीनगर, 30 मे (हिं.स.) : अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पांची प्रगती, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
दौऱ्याची सुरुवात दरेगाव (ता. जालना) येथील ड्रायपोर्ट प्रकल्प पाहणीने झाली. प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर त्यांनी जालना शहरातील मोतीबाग चौपाटी येथे सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांची पाहणी केली. कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेत शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये दर्जा कायम राखण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
त्यानंतर सिरसवाडी रोडवरील जिल्हा रेशीम कोष बाजारपेठ येथे भेट देऊन बाजारपेठेतील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. तसेच त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊन उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत माहिती घेतली. कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी बदनापूर येथील कृषी विज्ञान व संशोधन केंद्र येथे भेट देऊन संशोधन आणि कृषीविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.
या दौऱ्यामुळे जालना जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या प्रगतीला चालना मिळण्यासह शासकीय सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis