
परभणी, 30 मे (हिं.स.)।
मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) येथे आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेत परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटीच्या बाल वैज्ञानिकांनी उपकरणे, संशोधन, नवीकरणीय उर्जा याविषयी माहिती घेत विज्ञानोत्सव साजरा केला.
परभणी येथील एस्ट्रॉनॉमीकल सोसायटीतर्फे या दरम्यान झालेल्या कार्यशाळेसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता सातवीतील ४० विद्यार्थी निवडण्यात आली होती. पहिल्या दिवशी प्रा. डॉ. पराग नेमाडे यांनी भौतिक शास्त्रातील महत्त्वाच्या अशानॅनो मटेरियल अँड रिसर्च प्रयोगशातील विविध उपकरणांची माहिती दिली. प्रा. डॉ. आर. आर. देशमुख यांनी सरफेस कोटिंग प्रयोगशाळेतील मधील विविध उपकरणांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना फूड्स आणि फार्मा विभागांची सफरही घडवण्यात आली. दुसऱ्या दिवशी भाभा अनुसंधान संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपमा कुलकर्णी यांनी न्यूक्लिअर एनर्जी फॉर सोसायटी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. वसमत तालुक्याचे भूमिपुत्र वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. उदय अन्नपुरे यांनी फूड इंजीनियरिंग व टेक्नॉलॉजी यातील करियरबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. संदीप मोरे यांनी टेक्स्टाईल लॅबोरेटरीत ब्लॉक प्रिंटिंग व स्क्रीन प्रिंटिंग या कपड्यांवर करण्यात येणाऱ्या प्रोसेसबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इस्रोमधील निवृत्त शास्त्रज्ञ अरविंद कोलगे यांनी फिजिक्स विषयातील ऑफ ऑप्टिक्स तथा प्रकाशशास्त्र या विषयातील प्रकाशाच्या विविध प्रयोगांची मांडणी करून ते प्रत्यक्ष करून दाखवले. समारोपप्रसंगी आयसीटीचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधन कसे होते याविषयी मागदर्शन केले. यावेळी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमीटेडचे (आयएएस) मॅनेजिंग डायरेक्टर संजय काटकर, विशेष कार्यकारी अधिकारी नानासाहेब कदम यांची उपस्थिती होती. सना शेख, तनिष्का लाड, आदित्य गवळी या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड तर डॉ. रणजीत लाड यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यशाळेच्या संपूर्ण नियोजनामध्ये विशेष करून प्रशांत मुंढे (Research Associate and Admission Course Counsellor ICT Jalna, समन्वयक मराठी विद्यान परिषद परभणी, कार्यकारी सदस्य विज्ञान भारती), ICT मुंबईचे माजी विद्यार्थी प्रताप भोसले (MTech), ICT MUMBAI समुद्रशास्त्र (Oceanography) संशोधक अमर कच्छवे, पीएचडी स्कॉलर ऋषिकेश पांचाळ व पवन कदम, इंटर्न स्कॉलर्स पार्थ कायंदे व भूमी मांडलोई यांनी पुढाकार घेतला.
यशस्वीतेसाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर, सहसचिव प्रसाद वाघमारे, डॉ. विजयकिरण नरवाडे, दीपक शिंदे, अशोक लाड, दत्ता बनसोडे, सुरेश कुराडकर, गजानन चापके आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis