बाहेरून व्यसन करून येणाऱ्या युवकांना आता दोन हजारांचा दंड, मरकणार गावसभेचा निर्णय
गडचिरोली, 30 मे (हिं.स.) भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गम भागातील मरकनार येथे केवळ ७० घरांची वस्ती असलेल्या या छोट्याशा गावामध्ये आधीच अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. आता यापुढे पाऊल टाकत,
मरकणार गाव सभा बैठक


गडचिरोली, 30 मे (हिं.स.)

भामरागड तालुक्यातील कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गम भागातील मरकनार येथे केवळ ७० घरांची वस्ती असलेल्या या छोट्याशा गावामध्ये आधीच अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. आता यापुढे पाऊल टाकत, बाहेरून दारू पिऊन गावात येणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना चाप लावण्यासाठी थेट दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. मुक्तिपथ अभियानाच्या वतीने दोन दिवसीय सघन भेट उपक्रम राबविण्यात आला. त्याअनुषंगाने आयोजित गाव सभेत हा ठराव पारित करण्यात आला.

जिजाबाई मट्टामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत प्रामुख्याने १५ ते ३५ वयोगटातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी सखोल चर्चा झाली. गावात अवैध दारूविक्री बंद असली, तरी बाहेरून दारू, गोरगा, अथवा ताडी पिऊन गावात येणाऱ्यांमुळे गावातील वातावरण बिघडू नये, यासाठी गावाने कडक पाऊल उचलले आहे. गावाच्या हद्दीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात कोणीही युवक बाहेरून व्यसन करून आल्याचे आढळल्यास, त्याच्यावर २,००० रुपये दंड ठोकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. नवीन पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गावकऱ्यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. गावातील नियमांचे उल्लंघन केवळ गावकऱ्यांनीच नाही, तर बाहेरून येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही करू नये, असा इशारा ग्रामसभेने दिला आहे. गावात कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी व्यसन करून आल्यास, गावकऱ्यांना लागू असलेला दंडच त्यांनाही आकारला जाईल. दरम्यान, गावात आधीपासूनच खर्रा विक्री पूर्णपणे बंद असल्याने त्याचे अतिशय सकारात्मक आणि चांगले फलित सध्या पाहायला मिळत आहे.

६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून वाचवण्यासाठी गावात विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मुलांसमोर मोठ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असा नियम करण्यात आला आहे. आपल्या गावातील माता परिसर आणि इतर परिसर नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी ७० ही घरांच्या नागरिकांनी दर मंगळवारी एकत्र येत श्रमदान करण्याचे निश्चित केले. गावातील मुक्तिपथ समिती अधिक सक्रिय करत त्यात नवीन सदस्यांची भर घालण्यात आली. तसेच, महिलांच्या जनजागृतीसाठी ‘मुक्तिपथ शक्तीपथ’ स्त्री संघटनेची नवीन समिती गठित करण्यात आली. सण-उत्सव, देवधर्म, जन्म, लग्नकार्य किंवा अंत्यविधीच्या वेळी होणारा दारूचा वापर थांबवण्यासाठी सखोल चर्चा झाली. या विषयावर नियम तयार करण्यासाठी पुढील ग्रामसभेत अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे.

या सभेला सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, मन्नु वाचामी, किशोर मट्टामी, आरोग्य सेविका राजश्री लेखा, बिलबर मट्टामी, प्रियंका मट्टामी, बेबि मट्टामी, मधु मट्टामी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, मुक्तिपथ तालुका संघटिका नीळा किन्नाके, युवक व महिला उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande