
सोलापूर, 30 मे (हिं.स.)। माढा तालुक्यातील धानोरे येथे शक्तिपीठ महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमिनींची मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. मात्र या मोजणीला काही शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.महामार्गाच्या अधिसूचनेनंतर बाधित होणाऱ्या गट क्रमांकांची घोषणा करण्यात आली असून, बार्शी तालुक्यातील मोजणी पूर्ण झाल्यानंतर धानोरे येथे मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड आणि तहसीलदार संजय भोसले उपस्थित होते.
मोजणी सुरू असताना माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव तसेच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील शेतकरी धानोरे येथे दाखल झाले. त्यांनी मोजणी प्रक्रियेस हरकत घेत विरोध नोंदविला. यावेळी शेतकरी आणि मोजणी कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. या गोंधळात मोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीपीएस मशिनचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेनंतर बार्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या माढा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या.
दरम्यान, माढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांनी मोजणीस विरोध करणाऱ्या माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 50 हून अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेला विरोध आणि प्रशासनाची कारवाई यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड