ठाणे - ‘आनंद जनसंवाद’ द्वारे शिवसेना जनतेच्या दारी; शाखेतच होणार समस्येचे निराकरण
ठाणे, 30 मे (हिं.स.)। धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबारच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या ‘आनंद जनसंवाद’ मधुन शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहचत आहे. नागरिकांच्या समस्यांवर थेट स
‘आनंद जनसंवाद’ द्वारे शिवसेना जनतेच्या दारी...शाखेतच होणार समस्येचे निराकरण


ठाणे, 30 मे (हिं.स.)। धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आनंद आश्रमातील जनता दरबारच्या धर्तीवर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या ‘आनंद जनसंवाद’ मधुन शिवसेना आता थेट जनतेच्या दारी पोहचत आहे. नागरिकांच्या समस्यांवर थेट संवादातून तोडगा काढण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच “आनंद जनसंवाद” उपक्रमाला महात्मा फुलेनगर शिवसेना शाखेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बैठकीत परिसरातील पाणीटंचाई, जलकुंभ, पार्किंग, वाहतूक कोंडीसह विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. महात्मा फुले नगरासाठी स्वतंत्र जलकुंभ उभारण्याकरिता ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी दिली. तसेच, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने महात्मा फुले नगरवासियांचा पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

महात्मा फुले नगर येथील शिवसेना शाखेत शुक्रवारी “आनंद जनसंवाद” उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यापूर्वी टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “थेट जनतेपर्यंत पोहोचा” या दिलेल्या निर्देशानुसार आता हा उपक्रम प्रत्येक शाखेत आणि थेट नागरिकांच्या दारी राबविण्यात येत असल्याचे अशोक वैती यांनी सांगितले. शुक्रवारच्या या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेविका शितल ढमाले, नगरसेवक राकेश शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठ्याची समस्या, वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय तसेच इतर नागरी प्रश्न थेट मांडले. तब्बल शंभरहून अधिक निवेदने या जनसंवादात प्राप्त झाली. परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुसंवादातून आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावला जाईल, असा विश्वास अशोक वैती यांनी व्यक्त केला. तसेच, ज्या-ज्या शाखांकडून निमंत्रण येईल त्या प्रत्येक शाखेत जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या महासभेतील गोंधळावर भाष्य करताना वैती यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका केली. “ पालिकेत २०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात; मात्र बजेटच १०० कोटींचे असेल तर एवढा भ्रष्टाचार झाला कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ आरोप करून चालत नाही, तर भ्रष्टाचार सिद्धही झाला पाहिजे, असे सांगत महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा होत असते, तरीही सभागृहात गोंधळ घालणे म्हणजे स्वतःला हुशार सिद्ध करण्याचा प्रयत्न असल्याची उपरोधिक टीका त्यांनी नाव न घेता केली.

माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी “आनंद जनसंवाद” उपक्रमाचे कौतुक करताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमातील जनता दरबारच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. शिवसेनेने आजवर सव्वाशेहून अधिक जनता दरबार घेतले असून, नागरिकांना प्रशासनाकडे वारंवार धाव घेण्याची गरज भासू नये म्हणून शाखास्तरावरच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छोट्या समस्यांचे तात्काळ निराकरण तर मोठ्या प्रश्नांबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही साप्ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे, नगरसेवक राकेश शिंदे, शितल ढमाले यांनीही “आनंद जनसंवाद” उपक्रमामुळे समस्या सुटण्यासह नागरिकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळत असल्याचे सांगत माजी महापौर अशोक वैती यांचे आभार मानले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे विशेष स्वागत करत समाधान व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande