उदगीरसाठी ४०० कोटींच्या ४-लेन रिंगरोडला मंजुरी
लातूर, 31 मे (हिं.स.)।केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी उदगीरकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून उदगीरला आणखी एक मोठी विकास कामाची भेट मिळाली आहे. रुपये ४०० कोटी खर्चाच्या ४-लेन उद
उदगीरसाठी ४०० कोटींच्या ४-लेन रिंगरोडला मंजुरी


लातूर, 31 मे (हिं.स.)।केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी उदगीरकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून उदगीरला आणखी एक मोठी विकास कामाची भेट मिळाली आहे. रुपये ४०० कोटी खर्चाच्या ४-लेन उदगीर रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. हा नवीन रिंगरोड नळेगाव रोडपासून सुरु होवून नांदेड रोड ते सोमनाथपूर ते जळकोट रोड (पिंपरी) ते अवलकोंडा ते बोरतळा तांडा मार्गे रंगवाल तांडा (नागलगाव) जवळ देगलूर रोडला जोडण्यात येणार आहे.

उदगीर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्या तुलनेत अंतर्गत रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. त्याची दखल घेवून आ. संजय बनसोडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उदगीर रिंगरोडसाठी सातत्याने पाठपुरावा केला.

परिणामी ४०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पाला गडकरी यांनी मंजूरी दिलेली आहे. या रिंगरोडची रुंदी १०० फुट असेल. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने चार पदरी रस्ता, गरजेनुसार उड्डाणपुल, सर्विसरोड, अनेक जंक्शन पॉईंट यांचा समावेश असेल.

उदगीरला रिंगरोड मंजुर झाल्यामुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत. या रिंगरोडमुळे उदगीर शहरातील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. जड वाहने शहरात न येता बाहेरुन जावू शकतील. शहरातील प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. भविष्यातील शहर विस्ताराला चालना मिळेल, व्यापार उद्योग आणि स्थानिक विकासाला मोठी मदत होईल, हा प्रकल्प उदगीरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून शहराच्या विकासाला नवी गती देणारा ठरणार आहे. उदगीरच्या विकासासाठी आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ही आणखीन एक मोठी भेट मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande