
सोलापूर, 31 मे (हिं.स.)। बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड रोलरखाली सापडून आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
मृत मुलाचे वडील योगीराज चौधरी (रा. सुभाषनगर, बार्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शिवशक्ती मैदानावर समर कॅम्प आयोजित करण्यात आला होता. आरवने फी भरून या कॅम्पमध्ये प्रवेश घेतला होता आणि तो नियमितपणे सरावासाठी जात होता.
शनिवारी सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास कॅम्पमध्ये सहभागी असलेल्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांकडून क्रिकेट पिचवरील जड रोलर ओढून घेतला जात होता. फिर्यादीनुसार, त्यावेळी घटनास्थळी कोणताही तंत्रज्ञ किंवा जबाबदार प्रौढ व्यक्ती उपस्थित नव्हती. प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे काही अंतरावर उभे होते.
रोलर ओढत असताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यानंतर जड रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तत्काळ त्याला उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत असून क्रीडा शिबिरांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड