

रायगड, 31 मे (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील एकसल येथे राहणारा आणि वाय.एस.सी.सी. अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेणारा अवघ्या सहा वर्षांचा होतकरू क्रिकेटपटू नहुष मंगेश बोराडे याच्या भविष्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन”ने नहुषच्या शिक्षणासह क्रिकेट प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तसेच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक म्हणून दिनेश लाड यांची देशभर ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडूंनी क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
लहान वयातच नहुषने आपल्या खेळातील कौशल्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रशिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाची दखल घेत फाउंडेशनने त्याला विशेष सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे योग्य संधी मिळत नाहीत. अशा परिस्थितीत नहुषला मिळालेला हा पाठिंबा प्रेरणादायी मानला जात आहे.
फाउंडेशनतर्फे नहुषच्या शैक्षणिक खर्चासोबतच व्यावसायिक क्रिकेट प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “गुणवंत खेळाडूंना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. नहुषमध्ये उत्कृष्ट क्रिकेट क्षमता असून त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
या मदतीबद्दल आनंद व्यक्त करताना नहुष बोराडे म्हणाला, “माझ्या क्रिकेट प्रवासासाठी मिळालेला हा मोठा आधार आहे. मी अधिक मेहनत घेऊन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.” क्रिकेट क्षेत्रात अनेक यशस्वी क्रिकेटपटू घडवणाऱ्या दिनेश लाड यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, ग्रामीण भागातील युवा क्रिकेटपटूंना यामुळे नवी प्रेरणा मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)